पुणे, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : शिरूर शहरात आज केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांच्या वतीने आयोजित टायर-३ प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती पौर्णिमा बारहाते, वैज्ञानिक "डी" तथा कार्यालय प्रमुख, केंद्रीय भूजल विभाग, पुणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची उद्दिष्टे, लोकसहभागाचे महत्त्व आणि शाश्वत जलव्यवस्थापनासाठी विविध विभागांमधील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती सुवर्णा आदक, तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना जल व्यवस्थापनाशी त्यांचा समन्वय आणि तांत्रिक बाबींचे महत्त्व स्पष्ट केले. श्री. जयराम लहामटे, सहायक गट विकास अधिकारी यांनी पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधी, उपभोक्ता वर्ग, तांत्रिक तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वयाची गरज व्यक्त करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. यावेळी सादरीकरण करण्यात आलेल्या तांत्रिक सत्रात, श्री. उपेंद्र धोंडे, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक यांनी शासकीय जलसंधारण योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. पंचायत राज संस्था, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि उपभोक्ता वर्ग यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका त्यांनी सविस्तर स्पष्ट केल्या. श्री. प्रफुल्ल कामठे, कृषी अधिकारी यांनी शेततळ्यांचे प्रकार, इनलेट–आऊटलेट व्यवस्था, अस्तरीकरण, सामूहिक शेततळ्यांची संकल्पना व उपयोगिता यांची माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, अर्ज पद्धती आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती पौर्णिमा बारहाते यांनी भूजल विज्ञान, जलधरांचे गुणधर्म, जल बचत, जल अंदाजपत्रक तसेच राष्ट्रीय जलधर नकाशाकरण व व्यवस्थापन (NAQUIM) प्रकल्प – शिरूर याबाबत सविस्तर माहिती दिली. अनु व्ही, भूजलवैज्ञानिक यांनी कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या विविध पद्धती, स्थानिक जलधरांच्या गुणधर्मांनुसार योग्य स्थळ निवड आणि पुनर्भरण संरचनांच्या परिणामकारकतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच व्ही. हेमलता, भूजलवैज्ञानिक यांनी भूजल पातळी निरीक्षणाची पद्धत, माहिती संकलन आणि त्याचे वैज्ञानिक महत्त्व याविषयी माहिती दिली. श्री. शुभांशू तिवारी भूजलवैज्ञानिक यांनी जल गुणवत्ता आणि समस्या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या "कॅच द रेन" मोहिमेअंतर्गत "जलसंधारणासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू" अशी शपथ श्रीमती पौर्णिमा बारहाते यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शुभांशू तिवारी, भूजलवैज्ञानिक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टी. वेंकटगिरी (भूभौतिकी तज्ज्ञ), ओमप्रकाश ठाकूर, आकांक्षा बनकर, पंकज वाणी, सुनील वाघमारे आणि विजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था, शेतकरी, जलउपभोक्ता आणि स्थानिक नागरिक अशा एकूण ११० प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शाश्वत जलव्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
0 Comments