UID=
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2026 : देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. आत्मनिर्भर भारत, उत्पादन क्षेत्राचा विस्तार, तंत्रज्ञान व नवोन्मेष, ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा, कृषी, पायाभूत सुविधा, युवा व महिला सक्षमीकरण तसेच भारताच्या सॉफ्ट पॉवरला बळ देण्याची व्यापक रूपरेषा त्यांनी मांडली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि क्रांतिकारकांना अभिवादन केले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे विशेष महत्त्व अधोरेखित करताना "वंदे मातरम्"ला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच देशातील पूर, भूस्खलन आणि दरडी कोसळण्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त करून सरकार आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
2047 मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना भारत विकसित राष्ट्र म्हणून उभा राहावा, हे देशाचे मोठे स्वप्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 140 कोटी देशवासीयांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे लक्ष्य साध्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दशकातील विविध क्षेत्रांतील प्रगतीचा उल्लेख करताना भारताने आर्थिक, डिजिटल, संरक्षण, उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताच्या हितसंबंधांची सुरक्षितता स्वतःच्या क्षमतेवर करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. "मेक इन इंडिया", "स्वदेशी" आणि "व्होकल फॉर लोकल" या उपक्रमांच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने महत्त्वाची पावले उचलली असून आगामी काळात आणखी सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले.
महत्त्वाच्या खनिजांच्या उपलब्धतेसाठी "क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉर" आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावरही त्यांनी भर दिला. ऊर्जा सुरक्षा ही भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.
सौरऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक आणि हरित गतिशीलता या क्षेत्रांत भारताने आघाडी घेण्याचे आवाहन करण्यात आले. "पीएम सूर्य घर मोफत वीज योजना"च्या माध्यमातून घराघरांत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे विद्युतीकरण, मेट्रो, आधुनिक महामार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक्स यांचा विस्तार करून देशातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला.
देशाच्या पुढील विकासासाठी पंतप्रधानांनी "शक्तीच्या सप्तधारा" मांडल्या. यामध्ये उत्पादन, कृषी व अन्न उत्पादन, तंत्रज्ञान व नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण शक्ती, हरित व नील अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्ट पॉवर यांचा समावेश आहे.
उत्पादन क्षेत्रात भारताने जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासार्ह केंद्र बनावे, उत्पादनात गुणवत्ता आणि "झिरो-डिफेक्ट"ची ओळख निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले. "क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी" हा जागतिक बाजारपेठेसाठी भारताचा मंत्र असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्रात शेतापासून जागतिक निर्यात बाजारपेठेपर्यंत पोहोच निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अन्नप्रक्रिया, रासायनिक खतांचा कमी वापर आणि जागतिक दर्जाची कृषी उत्पादने यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.
भारताने केवळ जगाची बाजारपेठ न राहता नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ, रोबोटिक्स आणि डेटा सेंटर यांसारख्या नव्या क्षेत्रांत भारताने नेतृत्व करावे, असे त्यांनी नमूद केले. "मेड इन इंडिया 6G" जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे उद्दिष्टही त्यांनी मांडले.
विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. स्टार्टअप इंडिया, नवोन्मेष निधी, डिजिटल पायाभूत सुविधा, अंतराळ क्षेत्र आणि ड्रोन धोरणाच्या माध्यमातून युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष महत्त्वाची घोषणा करताना, येत्या एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य त्यांनी जाहीर केले. तसेच युवकांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा उपयोग करण्याची योजना असल्याचे सांगितले.
भारताने 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले. 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा प्रतिभा शोधण्यासाठी देशव्यापी गुणवत्ता शोध अभियान राबवण्याची घोषणा करण्यात आली. "खेलो इंडिया", TOPS, क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा वैद्यक आणि पोषण यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्र उभारणीत महिलांच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधानांनी "लखपती दीदी" अभियानाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली. तीन कोटी लखपती दीदींचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे सांगत आता सहा कोटी लखपती दीदी घडवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.
तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
भारताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ड्रोन, काउंटर-ड्रोन प्रणाली, हायपरसोनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत भारताने नेतृत्व करावे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण निर्यातीत झालेली वाढ अधोरेखित करत भारताने जागतिक संरक्षण पुरवठादार बनण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक बहुआयामी नागरी संरक्षण व्यवस्था उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
योग, आयुर्वेद, आरोग्य पर्यटन, हस्तकला, संस्कृती, चित्रपट, अॅनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून भारताची सॉफ्ट पॉवर जगभर पोहोचवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताने जागतिक पर्यटन, क्रीडा स्पर्धा आणि कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेतील संधींचा प्रभावीपणे उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
भाषणाच्या समारोपात पंतप्रधानांनी नागरिकांना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. "स्वतःपेक्षाही वर राष्ट्राचे हित असो आणि कर्तव्य हीच आपली ओळख असो," असा संदेश देत त्यांनी देशवासीयांना स्वप्नांना संकल्प, संकल्पाला सामर्थ्य आणि सामर्थ्याला यशात बदलण्याचे आवाहन केले.
"चला प्रत्येक पावलाला विकासाचे पाऊल बनवूया, पावलाला पाऊल मिळवूया, मनाला मनांशी जोडूया आणि मिळून विकसित भारत बनवूया," या आवाहनाने पंतप्रधानांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा समारोप केला.
0 Comments