UID= Samajik Aadhawa Weekly Newspaper | Maharashtra News
  • India
  • Last Update 11.30 am
  • 29℃ Pune, Maharastra
news-details
इतर

मेट्रो 13 ते पुणे रिंग रोडमुळे मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.  या बैठकीत मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो 13-मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे - शिवरे मार्गास मान्यता देण्यात आली.

अशी असेल मेट्रो-13
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मेट्रो 13 - मीरा भाईंदर ते वसई-विरार मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹17,724.99 कोटी अपेक्षित आहे. या मार्गाची एकूण लांबी 25.03 किलोमीटर असून, त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत, तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत असेल. या मार्गावर एकूण 16 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामध्ये 13 उन्नत आणि 3 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पात मेट्रो मार्गासह 4.92 किलोमीटर लांबीच्या वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणाऱ्या सहा पदरी (3+3) रस्ता आणि मेट्रोच्या एकत्रित पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे.
मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो 13 मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडला जाणार असून, मेट्रो मार्ग क्रमांक 9 शी नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बस सेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मान्यतेनंतर 5 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मीरा भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्ग क्रमांक 13 या मार्गासाठी येत्या 6 महिन्यांत भूसंपादन व पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2031 मध्ये या मार्गावर दररोज सुमारे 4.49 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे रस्त्याच्या प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ 50% कमी होईल, खासगी वाहनांचा वापर व मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनातही घट होईल. औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांसह वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांची जोडणीही या मार्गामुळे अधिक सक्षम होणार आहे. 
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारीकरण प्रकल्पाच्या ₹10,502.36 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी (वळती) ते पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे (बु.) (शिवरे) या 31.805 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणे हा या रिंग रोडचा उद्देश आहे. संपूर्ण 168.981 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची सलगता सुनिश्चित झाल्यानंतर एकात्मिक प्रवेश नियंत्रित मार्गिका पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी 80% भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या मार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी 3 मार्गिका असतील. मार्गाची नियोजित वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असून, प्रकल्पात 1 इंटरचेंज, 3 मोठे पूल, 5 लहान पूल, 18 उन्नत मार्ग किंवा उड्डाणपूल आणि 4 बोगद्यांचा समावेश आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण तसेच इंटरचेंजजवळ लँडस्केपिंग प्रस्तावित आहे.



#Metro13, # MiraBhayandar, # VasaiVirar, # MumbaiMetro, # MumbaiTransport, # MMRDA, # PuneRingRoad, # PuneRingRoadProject, # PuneTraffic, # PuneInfrastructure, # MaharashtraInfrastructure, # DevendraFadnavis, # EknathShinde, # SunetraAjitPawar, # UrbanTransport, # InfrastructureDevelopment, # RoadDevelopment, # MetroRail, # TrafficManagement, # MaharashtraDevelopment, # MumbaiPuneConnectivity, # SmartTransport, # Expressway, # LandAcquisition, # PublicTransport, # MaharashtraGovernment,

You can share this post!

0 Comments

Leave Comments