UID=
लायन्स क्लब ऑफ पुणे सिनियर्सच्या वतीने आज तळजाई राखीव वन, पुणे येथे सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन व मधमाशी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात अरण्येश्वर इंग्लिश मीडियम स्कूल येथील सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी वृक्षारोपण जनजागृती रॅली काढल्यानंतर तळजाई राखीव वन परिसरात प्रत्यक्ष वृक्षारोपण केले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा परांडे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाला श्री. श्याम भुरके, श्री. राजेश दातार तसेच लायन्स क्लबचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वन विभागाचे श्री. यादव, श्री. घाडगे, श्री. भोरडे तसेच त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी श्री. श्याम भुरके यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
त्यानंतर इंडियन नॅचरल हनीबीज, पुणेचे श्री. संजय मारणे यांनी विद्यार्थ्यांना मधमाश्यांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व, परागीभवन (Pollination), भारतातील मधमाश्यांचे विविध प्रकार, मध, मधमेण, परागकण, प्रोपोलिस, रॉयल जेली यांसारखी मधमाशी उत्पादने तसेच शेती, फळबागा, जैवविविधता आणि मानवी जीवनासाठी मधमाश्या किती उपयुक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रसिद्ध गायक श्री. राजेश दातार यांनी पर्यावरण व निसर्ग संवर्धनावर आधारित मराठी गीते सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी व यशस्वी झाल्याचे सांगून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ पुणे सिनियर्सचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील आणि सचिव श्री. संजय मारणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “झाडे लावा – पर्यावरण वाचवा, मधमाश्या वाचवा – भविष्य वाचवा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
0 Comments